अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेला मंजुरी

अमरावतीतील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि संलग्न रुग्णालयाच्या उभारणीचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाला आहे. अमरावतीजवळील आलियाबाद येथील बारा हेक्टर जमिनीचा ताबा वैद्यकीय शिक्षण विभागाकडे सोपवण्यास महसूल विभागाने अधिकृत मंजुरी दिली आहे. राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या महत्त्वपूर्ण निर्णयाची घोषणा केली.

या मंजुरीमुळे अमरावतीमध्ये शंभर विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारले जाईल. तसेच यामुळे जिल्ह्यातील आणि विभागातील वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठी संधी उपलब्ध होणार आहे. केवळ महाविद्यालयच नव्हे, तर या प्रकल्पाचा एक भाग म्हणून चारेशहून अधिक रुग्णखाटांचे अत्यंत अद्ययावत असे रुग्णालय देखील स्थापन करण्यात येणार आहे. जमिनीचा ताबा मिळाल्यापासून पुढील तीन वर्षांच्या आत नियोजित प्रकल्पाचे काम सुरू करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच, सरकारने या जागेच्या वापराबाबत कडक अटी घातल्या आहेत. महसूल विभागाच्या पूर्वपरवानगीशिवाय या जमिनीची विक्री, देणगी, गहाण ठेवणे किंवा कोणत्याही खाजगी-सार्वजनिक भागीदारी तत्त्वावर हस्तांतरण करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

अमरावती जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची मागणी गेली अनेक वर्षे सातत्याने केली जात होती. पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, यवतमाळ यांसारख्या जिल्ह्यांमधील रुग्णांना मोठ्या उपचारांसाठी अनेकदा नागपूर किंवा मुंबईकडे धाव घ्यावी लागते. अमरावतीत हे महाविद्यालय आणि रुग्णालय कार्यान्वित झाल्यामुळे स्थानिक पातळीवरच तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा उपलब्ध होईल आणि गंभीर आजारांवरील उपचारांसाठी होणारी धावपळ थांबेल. आरोग्यसेवा म्हणजे ईश्वरसेवा, हाच आमच्या सरकारचा ध्यास आहे. अमरावती जिल्ह्यातील नागरिकांची ही मागणी रास्त होती आणि ती पूर्ण करताना आम्हाला आनंद होत आहे. या निर्णयामुळे केवळ अमरावतीच नव्हे, तर संपूर्ण पश्चिम विदर्भातील आरोग्य व्यवस्थेला मोठी बळकटी मिळणार आहे. स्थानिक विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणासाठी आता बाहेर जाण्याची गरज भासणार नाही आणि गरिबांना मोफत व चांगल्या दर्जाचे उपचार एकाच छताखाली मिळतील, असे मत यावेळी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व्यक्त केले.

Share this post :

Facebook
Twitter
LinkedIn
Pinterest

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *